गिरजा नदीला महापूर: खुलताबाद तालुक्यातील देवळाना बुद्रुक-खुर्द गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शाळेत पाणी शिरून अंगणवाडीची अन्नधान्ये नष्ट; गावकरी संतापले
खुलताबाद तालुक्यातील देवळाना बुद्रुक-खुर्द येथे गिरजा नदीला महापूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरून अंगणवाडीचे अन्नधान्य नष्ट, कंपाऊंड भिंत वाहून गेली. गावकरी शाळेचे स्थलांतर आणि पुलाच्या बांधकामाची चौकशी मागत आहेत.

खुलताबाद, दि. २८ सप्टेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी): मराठवाड्यातील खुलताबाद तालुक्यातील देवळाना बुद्रुक-खुर्द येथील गिरजा नदीला अचानक महापूर आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमारास नदीने रौद्र रूप धारण केल्याने गावकरी संपूर्ण रात्र जागृत राहिले. नदीच्या पाण्याने गावात शिरण्याची शक्यता असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. याच महापुरात नदीकाठावरील जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले असून, शाळेची संपूर्ण भिंत आणि कंपाऊंड वाहून गेला आहे. यामुळे शाळेतील अंगणवाडी केंद्रातील लहान मुलांसाठी साठवलेले तांदूळ, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू पूर्णपणे भिजून नष्ट झाल्या आहेत.
या घटनेचे आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे, जर हा महापूर दिवसा आला असता आणि शाळेत मुले उपस्थित असती, तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. गावकरी सांगतात, "रात्री नदीचा वराड पाहून आम्ही घाबरलो होतो. पण सकाळी शाळेची दशा पाहून धक्क बसला. अनेक दिवसांपासून आम्ही प्रशासनाकडे शाळेची नवीन इमारत दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची किंवा नदीकाठावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करत आहोत, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही." गावकऱ्यांमध्ये आता शाळेचे स्थलांतर करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. "गावकऱ्यांसाठी नसले तरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी तरी प्रशासनाने जागे व्हावी," असे गावकरी म्हणतात.
याशिवाय, शाळेच्या समोर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामातील भीत (रिटेनिंग वॉल) देखील महापुरात वाहून गेली आहे. यावर आता गावकऱ्यांमध्ये शंका उपस्थित होत असून, या बांधकामाची गुणवत्ता आणि कामाची पारदर्शकता याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे. पुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला असताना, अशी दुर्दैवी घटना घडणे हे गंभीर आहे. गावकरी प्रशासनाकडे तातडीने मदत आणि चौकशीची मागणी करत आहेत.
या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर मोठे नुकसान झाले असून, पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तालुका प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची अपेक्षा आहे. याबाबत तहसीलदार तथा स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. गावकरी आता लोकप्रतिनिधींच्या मदतीची वाट पाहत आहेत.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.