औरंगाबाद: गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी
वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या गायरान जमीन अतिक्रमण काढण्याच्या आदेशाविरोधात निषेध करत होळी केली, तीव्र आंदोलनाचा इशारा.

औरंगाबाद, २१ जुलै २०२५: औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण सरसगट काढून टाकण्याचे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या परिपत्रकाविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय उपायुक्त (महसूल) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि या आदेशाची होळी करत आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने गायरान जमीनीवरच पंतप्रधान, शबरी, रमाई आदी घरकुल योजनांचा लाभ दिला आहे. याच जमीनीवर शेती करून उपजीविका चालवणारे आणि घरे बांधून राहणारे गरीब, भूमिहीन नागरिक राहत आहेत. तरीही जिल्हाधिकारी, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सल्ल्याने, या नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आघाडीने केला आहे. "जिल्ह्यातील गायरान जमिनी लाटण्याचा डाव आहे," असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.
आघाडीने यापूर्वीही गायरान जमीनीवरील अतिक्रमण धारकांच्या नावावर जमिनी नियमित करण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना निवेदने दिली, निदर्शने आणि धरणे आंदोलन केले. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मागील पावसाळी अधिवेशनात मुंबईत राज्य विधीमंडळावर मोर्चा काढला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायरान जमीनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचे आश्वासन दिले होते, याकडेही आघाडीने लक्ष वेधले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतीसाठी गायरान जमिनीचा वापर करणाऱ्या अतिक्रमण धारकांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले असून, घरकुल धारकांनी ग्रामपंचायतीमार्फत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून "केराची टोपली" दाखवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेऊन गरीबांना न्याय द्यावा, अन्यथा ते रस्त्यावर येतील, असा इशारा आघाडीने दिला आहे.
या आदेशाविरोधात कार्यकर्त्यांनी आक्रमक होत परिपत्रकाची होळी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्ष (मध्य) संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, मध्य शहर महासचिव भगवान खिल्लारे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, संपर्क प्रमुख गणेश खोतकर, जिल्हा सचिव सुभाष कांबळे, गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल, भय्यासाहेब जाधव, रवि रत्नपारखे, एस. पी. मगरे, खुलताबाद तालुका महासचिव राजाराम घुसाळे, प्रभाकर घाटे, विजय घाटे, योगेश घाटे, सुधाकर घाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने शेवटी चेतावणी दिली की, जर जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकानुसार कार्यवाही सुरू ठेवली, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.